Thursday, March 16, 2017

कुठलाही मराठी माणूस दिल्लीत मोठा होणार म्हंटलं कि इतर मराठी राजकारणी लोकांची तोंडे झालीच वाकडी ! ह्यांना काय भाजपमध्ये दुसरा लायक माणूस मिळाला नसता का ? पण ह्यांचे इगो मोठे ह्यांना संरक्षण मंत्र्याच्या हाताखाली मंत्री व्हायचे आहे आलतूफालतू माणसाच्या हाताखाली नाही . शरद पवार प्राईममिनिस्टर झाले तर ह्या विचाराने ह्यांच्या पोटात गोळा ! शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेला विरोध करणारे हेच ! पहिल्या बाजीरावाचे   , होळकर शिंद्यांचे पाय खेचणारे हेच . आपल्या माणसाने टोपलीत महाराज व्हावे पण दिल्लीत नाही . ढसाळ नोबल मिळवू शकतात म्हंटल्यावर ह्यांनीच त्यांची निंदा चालू केली . परिणाम गेल्या पांच हजार वर्षात दिल्लीवर मराठी माणसाचे राज्य नाही . नतद्रष्टपणाचे नोबेल असेल तर ते प्रथम मराठी समाजाला मिळेल . परिकर तुमच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला गल्लीत आणल्याबद्दल समस्त गोवेकरांच्यावतीने मी तुमची माफी मागतो .
श्रीधर तिळवे -नाईक 
राजाच्या कपड्याची किंमत बघता तसे वाटत नाही आणि आपले लोक असे कि कपडे बघून आणि झेंडे बघून मत बनवतात आणि देतातही 

Friday, February 24, 2017

चेहरा आणि निवडणूका श्रीधर  तिळवे नाईक

मुख्य मुद्दा तुमच्याकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ह्यासाठी कोणता चेहरा आहे हाच असतो . भारतात संसदीय पद्धतीची अध्यक्षीय राजवट चालते . आणि ह्या वेळी भाजपकडे पंतप्रधानासाठी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणीस असे दोन ठाम चेहरे होते . काँग्रेसचा राहुल गांधी हा चेहरा आणि बहुजन पार्टीचा मायावती हा चेहरा जनतेने पूर्ण नाकारला आहे . जनतेला हे चेहरे खात्रीशीर वाटत नाहीयेत . काँग्रेसकडे असलेला मनमोहसिंग हा चेहरा ( तो खूप म्हातारा आहे हे मान्य असूनही )निदान येऊ घातलेल्या निवडणुकीत तरी पुढे आणावा सोनियांनी आपले पुत्र प्रेम बाजूला काढून ठेवावे अन्यथा काँग्रेस बुडणे अटळ आहे . बाळासाहेब ठाकरे हा शिवसेनेचा ठाम आणि पक्का चेहरा होता आणि बाळासाहेबांनी पुढचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे ह्यांची निवड केली आणि तिथेच राज ठाकरेंचे राजकीय भविष्य सीलबंद झाले . शिवसेनेला उद्धव ठाकरे हा स्थिर चेहरा प्राप्त असल्यानेच मुंबईत आणि ठाण्यात यश मिळाले . रिपब्लिकन आणि कम्युनिस्ट ह्यांना ह्या देशात कधीही राष्ट्रमान्य चेहरा मिळालेला नाही आणि चेहरा नसलेला पक्ष ह्या देशातील जनतेला चालत नाही (अपवाद बंगाल मध्ये ज्योती बसू व केरळ ). जयप्रकाश नारायण हा जनता पक्षाचा चेहरा होता म्हणून इंदिराजी हरल्या पण ह्या चेहऱ्याचा लय होताच पुन्हा एकचेहरी विजयी झाल्या . पुढे राजीव गांधी , सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग ह्या चेहऱ्यांनी काँग्रेस वाचवली चेहरा असेल तरच तुमचे फेसबुकिंग , व्होटबुकिंग  आणि फेसबुकही वाढते . शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर स्वतःचा वेगळा चेहरा निर्माण करण्यात पूर्ण अपयशी झालेत आणि त्यांची त्यांच्या पूर्वीच्या चेहऱ्याची पुण्याई संपत चाललीये आणि सुप्रियाताईंना स्वतःचा वेगळा चेहरा निर्माण करण्यात अपयश आलंय . अजित पवार आणि राहुल गांधी एकाच माळेचे मणी आहेत . ह्या देशातील आणि बहुदा कुठल्याही देशातील जनतेला अमूर्तात व्होटिंग करण्याची इच्छा नसते भाजपचा विजय हा नरेन्द्र मोदी आणि देवेंद्र फडणीस ह्या ठामपणे देण्यात आलेल्या आणि ठामपणे वावरणाऱ्या चेहऱ्यांचा विजय आहे हा देश मुर्तीपुजकांचा देश आहे आणि निवडणुकीत त्याला पक्षमूर्ती लागतात भाजपकडे अशा पक्षमूर्ती आहेत आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे . अध्यात्मिक लोकांनी राजकारणावर शक्यतो भाष्य  करू नये अशी वहिवाट आहे ती मोडल्याबद्दल सर्वांचीच क्षमा मागतो .
श्रीधर तिळवे नाईक
DATE 25 FEB 2015