Wednesday, October 5, 2022

IDEOLOGY

आयडियॉलॉजिकल इंटिग्रिटी आणि शिंदे ठाकरे वाद श्रीधर तिळवे नाईक 

न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे निर्णयाधिकार सोपवला व निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण वापरण्याचा अधिकार दोन्ही गटांना नाकारून एका अर्थाने शिवसेना संपवली आणि शिंदे गटाची आत्महत्या पूर्ण झाली मराठी लोकांचे नामकरण संपले खरंतर जे घडलं ते चांगलं न्हवतं आणि नाहीये पूर्वी भोसले घराण्याच्या भांडणात दोन गाद्या झाल्या आणि शेवटी सत्ता पेशव्यांच्याकडे गेली  इतिहासाचा अभिमान बाळगायचा पण इतिहासापासून शिकायचे काहीच नाही हा मराठी लोकांचा पिंड आहे मुख्य म्हणजे हे काहीतरी घरगुती भांडण अशा स्टाईलने हे सगळं प्रोजेक्ट केलं गेलं मी माझ्या पहिल्याच लेखात म्हणालो होतो कि हा शिवसेना संपवण्याचा व मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचा डाव आहे ह्या सगळ्यामागे एक विशाल व्यूहरचना आहे 

उत्तराधुनिकतेने आयडियालॉजी इज डेड अशी घोषणा देऊन कार्पोरेटवादात आयडियालॉजीला काहीच स्थान नाही हे अंडरलाईन केलं होतं ह्यामागे रशियात झालेला कम्युनिझमचा अस्त होता वास्तविक हे चुकीचे आकलन होते हा आयडियालॉजीचा अस्त न्हवे तर पारंपरिक आयडियालॉजीन्चा व मार्क्सवादी कम्युनिझमचा अस्त होता ह्याचवेळी मोनोपार्टियल कार्पोरेटीझमचा ऑलरेडी उदय झाला होता व चीनमध्ये त्याने  कार्पोरेट कम्युनिझमचा चेहरा धारण केलेला  होता आणि तो ग्रुपल प्रायव्हेट कार्पोरेटवादाला चॅलेंज करत होता ही गोष्ट ह्या उत्तराधुनिक विचारवंतांनी सोयीस्कररीत्या डोळेआड केली होती 

भारतात ह्या ग्रुपल कार्पोरेटवाद नरसिंहराव व मनमोहनसिंग ह्यांनी स्वीकारला मात्र त्यांनी लिबरल कार्पोरेट पॉलिटिक्सची कास सोडली नाही .  पुढे नरेंद्र मोदी ह्यांनी ह्या ग्रुपल कार्पोरेटवादाला मान्यता देऊन त्याचे बिग हाऊस कार्पोरेटवादात रूपांतर केले त्यासाठी जीएसटी डिमॉनिटायझेशन वैग्रे केले जे अनेकांच्या पचनी पडलेले नाही मूळात हे रूपांतर चांगले कि वाईट हे पुढच्या वर्षापर्यँत स्पष्ट होईल आणि मोदी ह्यांचे भविष्य त्यावरून ठरेल कोव्हीड आला नसता तर ते ह्यावर्षीच स्पष्ट झाले असते ह्या बिग हाऊस कार्पोरेटीझममध्ये पॉलिटिकल पार्ट्यांची संख्याही मर्यादित करणे आवश्यक बनते कारण पन्नास पार्ट्यांना फायनान्स देणे आणि त्याचा हिशेब ठेवून फेवर मागणे ही एक डोकेदुखी ठरते अशावेळी किमान आयडियॉलॉजिकल इंटिग्रिटीच्या आधारेतीन चार  बिग हाऊस कार्पोरेटसारख्या बिग हाऊस कार्पोरेट पार्ट्या निर्माण करणे ही गरज बनते कारण वेगवान निर्णयांची गरज !

कार्पोरेट मोनोपार्टिझममध्ये उदा कार्पोरेट कम्युनिझममध्ये कम्युनिस्ट पार्टी एकच पार्टी असल्याने आर्थिक स्पर्धेत ती फार वेगवान होते आणि त्याचा परिणाम म्हणून बिग हाऊस कार्पोरेटीझम मागे पडू शकतो अर्थात कधी कधी एकांधळेपणाही येऊ शकतो म्हणजे चायनात २०१७ पर्यंत चायनीज बॉल पेन न बनण्याचे कारण चायनीज स्टीलची टीप पॉईंट बनवण्याची अक्षमता व त्यापेक्षाही अधिक  कम्युनिस्ट पार्टी होती पण हा अपवाद असतो एरव्ही कार्पोरेट कम्युनिझम वेगाने निर्णय घेतो आणि आर्थिक प्रगती वेगवान होते अर्थात कधीकधी ह्याचा तोटाही होतो उदा पुतिनने कार्पोरेट मोनोपार्टिझमच्या  दिशेने जी पावले टाकली त्याचा फायदा रशियाला झालेला आता दिसतो आहे पण त्यातूनच युक्रेन युद्धही निर्माण झालेले दिसते कारण कम्युनिझम कार्पोरेट झाला तरी विस्ताराकांक्षा सोडू शकत नाही ह्या विस्तारांकक्षेसाठीही आयडियॉलॉजिकल इंटिग्रिटी ही आवश्यक बनते कारण त्यामुळे पोलिटिकल डिसिजन वेगवान होतात आणि सध्या जी स्पर्धा आहे विशेषतः चीनशी तिथे सत्ताधारी पार्टीकडून वेगवान निर्णय मिळणे ही मार्केटल नीड म्हणजे बाजारू गरज बनलेली आहे साहजिकच भारतात जर मोनोपार्टियल कार्पोरेटीझम आला तर तो काहींना हवा आहे ह्यातला धोखा त्यांना कळत नाहीये म्हणजे जोवर सत्ताधारी पार्टी तुमच्या तालावर नाचते तोवर ठीक आहे पण ती रुष्ट झाली तर होत्याचे न्हवते होऊ शकते पण पैश्याने आंधळे झालेल्या अंबानी अदाणींना हे कोण समजवणार ?

प्रश्न असा आहे कि मोदी कार्पोरेट मोनोपार्टिझमकडे पाऊले टाकत आहेत का ? आणि बिग हाऊस कार्पोरेटीझम हे फक्त त्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे का ? ह्यापुढचा प्रश्न भारतात ह्या बिग हाऊस कार्पोरेटीझमलाही आयडियॉलॉजिकल इंटिग्रिटी ही आवश्यक वाटायला लागली आहे का ? तसे असेल तर साहजिकच हिंदुत्ववादासाठी आयडियॉलॉजिकल इंटिग्रिटी ही अपरिहार्य होते व त्यासाठी सर्वच हिंदुत्ववादी संघटना व पक्ष एका झेंड्याखाली आणणे गरजेचे बनते हे करायचे असेल तर शिवसेना गिळणे आवश्यक बनते आणि हे करण्यासाठी शिंदे ह्यांच्याहून योग्य कोण होते व आहे  ?

भारतीय संस्कृतीत आर्य कायमच विस्तारांकाक्षी व मोनोपार्टियल राहिलेले आहेत ह्याउलट शैवांना विस्ताराकांक्षेत काडीचाही रस नाही आणि त्यातूनच आजचा पेच निर्माण झाला आहे समजा जर भाजपऐवजी शिवसेनाच राष्ट्रीय हिंदुत्ववादी पक्ष झाला असता तर हे घडले असते ? पण हे घडले नाही कारण त्यासाठी पैसा ओतावा लागतो घरात ठेवून चालत नाही महादजी शिंदे किंवा मल्हारराव होळकर आणि अगदी यशवंतराव होळकर दिल्लीचे तख्ताधीश झाले असते तर ब्रिटिश विजयी झाले असते ? संकुचित राहणे हा  मराठा (हा शब्द मी जो मराठी बोलतो व मराठीत बोलतो तो मराठा ह्या व्याख्येनुसार वापरत आहे असतो ) मानसिकतेचा स्वभाव आहे परिणाम एकच होतो जेव्हा तुम्ही आक्रमण करत नाही तेव्हा समोरचा कधी ना कधी तुमच्यावर आक्रमण करतोच शिवाजी महाराजांनी  दिल्लीवर चाल केली नाही म्हणून औरंगजेब थोडाच दिल्लीत थांबणार आहे ? शेवटी भारत व्यापण्याची महत्वाकांक्षा दिल्लीत गेलात कि आपोआप निर्माण होते मोदी शहां ह्याला अपवाद कसे असतील ? त्यांना ही संधी शिंदे ह्यांच्यामधील अस्वस्थतेने व असंतोषाने दिली 

बिग हाऊस कार्पोरेटीझमला मुंबई महानगरपालिका आता आपल्या हिशेबाने चालवायची आहे त्यांच्या ह्या कारभाराविषयी अनेक तक्रारी आहेत म्हणजे साधे रस्तेही ह्या लोकांनी धड ठेवले नाहीत वैग्रे बिग हाऊस कार्पोरेट्समधला हा असंतोष शांत करण्यासाठी शिवसेना काय करणार आहे ? बीएमसीचे बजेट मोठे इन्कम मोठे पण पण प्रत्यक्ष कारभारात ते कुठे आहे ? उद्धव ठाकरे ह्यांनी कोव्हीड उत्तम हाताळला ह्याबद्दल शंका नाही पण हे पुरेसं नाही ह्यापुढे बीएमसी अतिशय कार्यक्षम पद्धतीने चालवली जाईल अशी हमी हवी आहे ती द्यायला शिवसेना तयार आहे का ? मुंबईची अख्खी संस्कृतीचं कार्पोरेट झालीये आणि तिचा कारभारही तसाच चालला पाहिजे मोदी शहा ही ग्यारेंटी देतायत आणि ही ग्यारेंटि सफल व्हायची असेल तर शिवसेनेला हरवणे गरजेचे आहे म्हणून शिवसेना फोडली गेलीये मुंबईत मराठी संस्कृती कुणालाच नको आहे अगदी मराठी लोकांनाही ती नको आहे अन्यथा मुंबईतील सगळे मराठीचे प्राध्यापकानीं  आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमात कशाला टाकले असते ?खुद्द ठाकरे कुटुंबीय आपली मुले कुठल्या माध्यमात टाकतात ? व ते त्यांना इंग्लिश माध्यमात टाकतात तेव्हा ते काय सुचवतात ? जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःची भाषा मारता तेव्हा पुतना मावशी आयात करण्याची गरजच काय ? त्यामुळे मुंबई कार्पोरेट कल्चर बनलीय हे मराठी लोकांनीही स्वीकारलंय आणि कार्पोरेट संस्कृतीची भाषा मराठी नसणार हे सत्यही ! वस्तुस्थिती अशी आहे कि महाराष्ट्रातल्या बीजेपीतल्या गैरमराठी लॉबीला आता असं वाटतंय कि मुंबई मराठी लोकांच्या ताब्यातून घेण्याची वेळ झाली आहे आणि काँग्रेसमधील गैरमाराठी लोकांची ह्याला आतून संमती आहे 

ह्यातूनच काही विरोधाभास निर्माण झालेत आयडियॉलॉजिकल इंटिग्रिटी म्हणून हिंदुत्व एक आहे तर शिवसेना फोडलीच का ? आयडियॉलॉजिकल इंटिग्रिटीसाठी का होईना शिवसेनेला व  ठाकरे ह्यांना मुख्यमंत्रीपद का दिले गेले नाही ? ते जर दिले गेले असते तर फूट पडलीच नसती हिंदुत्व ही आयडियॉलॉजिकल इंटिग्रिटी आहे तर ठाकरे ह्यांनी क्षणभर वचनभंग बाजूला करून एकत्र राज्य करायला सांगितलंय ह्या जनतेच्या निर्णयाचा का सन्मान केला नाही ? म्हणजे उद्धव ठाकरे ह्यांना नेमका कशाचा राग आहे ? वचनभंगाचा ?

वचनभंग हा मुद्दा असेल तर ह्यावरून एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे हिंदुत्वात वचनभंग बसतो कि नाही ? तर नाही बसत ! त्यामुळं इथं भाजपचं चुकलं असंच म्हणायला हवं पण मग ह्यावर उपाय काय ? इमोशनल होऊन काँग्रेसशी युती करण्याचा  निर्णय घेणं ? उद्धव ठाकरे ह्यांच्यापुढे एक मार्ग होता भाजपला अडीच वर्षे बाहेरून पाठिंबा देणे आणि भाजपला सतत हे आम्ही तुम्ही वचनभंग केलाय म्हणून करतोय असं सांगणं . लाजेकाजेस्तव का होईना पण भाजप शरण आला असता आणि उरलेली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिलं असतं आणि समजा नसतं दिलं तर मग वचनभंगाचे कारण देऊन काँग्रेसबरोबर तुम्ही युतीत आला असता तर तुमची नैतिकता अधिक झळाळली असती 

आता ह्याचा परिणाम काय झाला किमान दोन प्रकारची हिन्दुत्वे आहेत हे उद्धव ठाकरे ह्यांना  सतत स्पष्ट करावं लागत आहे म्हणजेच एका अर्थाने आयडियॉलॉजिकल इंटिग्रिटीला ठाकरे नकार देत आहेत आणि ह्याचं काय करायचं हे बिग हाऊस इकोनॉमीला व ती चालवणाऱ्या कार्पोरेटीझमला कळत नाहीये  अशावेळी लोक कुणाच्या मागे जातात त्याच्या मागे जाण्याची कार्पोरेटीझमची वृत्ती असते म्हणजेच आता इलेक्शन्स जिंकणं हे उद्धव ठाकरे  ह्यांच्यासाठी अपरिहार्य झालं आहे मला एक आवडलं कि उद्धवराव त्यासाठी सज्ज होतायत सुदैवाने उद्धव ठाकरे ह्यांच्याकडे  शिंदे व राज ठाकरे ह्यांच्याकडे नसलेला कार्पोरेट लूक व व्यक्तिमत्व आहे ते अजूनही बिग हाऊसेसना जाऊन आम्ही बीएमसी व्यवस्थित चालवू अशी हमी देऊन इलेक्शन लढवण्यासाठी पैसे देऊ शकतात बी एम सी तुम्ही नीट चालवू शकला नाहीत ही वस्तुस्थिती पण ती बदलण्याची ताकद उद्धव ठाकरे ह्यांच्यात आहे कोव्हीड काळात त्यांनी ते सिद्ध केले आहे ह्याबाबत त्यांनी कमावलेली विश्वासार्हता अजूनही शाबूत आहे 

शेवटी तुमची संस्कृती काय भाषेतून बोलते त्याच भाषेतून तुम्हाला प्रत्युत्तर मिळणे अटळ असते खुद्द शिवसेनेने मराठी लोकांच्यासाठी काय केले हा प्रश्न त्यामुळेच हल्ली विचारला जात आहे एकट्या नितीन गडकऱ्यांनी गरीब पेशण्टसच्यासाठी जेवढ्या हृदयशस्त्रक्रिया घडवून आणल्या तेवढ्या शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी मिळून घडवून आणलेत का ? ह्यासारखे प्रश्न त्यातूनच विचारले जात आहेत शिवसेनेला इलेक्शन कॅम्पेनिंगमधून ह्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील मुंबई एकदा का मराठी लोकांच्या हातून गेली कि ती पुन्हा लोकशाही मार्गाने हाताशी लागणार नाही तेव्हा ह्या इलेक्शनमध्ये मराठी लोकांना  एकगठ्ठा मतदान करावे लागेल हे मतदान एकगठ्ठा होऊ नये म्हणूनच शिवसेना फोडली गेली आहे दुर्देवाची गोष्ट अशी कि शिंदे ह्यांना हे कळत नाहीये माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे कि शिंदे ह्यांनी पुन्हा ठाकरे ह्यांच्या गटात विलीन व्हावं इतकेच कशाला राज ठाकरे ह्यांनीही बीएमसी इलेक्शनमध्ये  उद्धव ठाकरे ह्यांना जॉईन व्हावं ही वेळ भांडणाची नाही तर एकत्र लढण्याची आहे आणि उद्धव ठाकरे ह्यांनीही अहंकार न आणता सर्वांना वेलकम देऊन एकत्र आणावे अधिक सिटा द्याव्यात शेवटी बाळासाहेब ठाकरे ह्यांनी तुम्हाला शिवसेनेची जी सूत्रे हातात दिलेत ती मराठी लोकांच्या ऐक्यासाठी दिली आहेत 

अनेकांना माझ्या ह्या स्टान्सचं आश्चर्य वाटेल पण माझा पहिला चॉईस जग दुसरा भारत व तिसरा मराठी आहे पण जेव्हा स्थानिक निवडणूक असते तेव्हा स्थानिकांनाच प्राधान्य मिळालं पाहिजे असं माझं मत आहे .मुंबईऐवजी अहमदाबादच्या एएमसीचा प्रश्न असता तर मी गुजराती लोकांच्या मागे उभा राहिलो असतो जागतिकीकरणाचा अर्थ स्थानिकांची नासाडी असा होत नाही तर स्थानिकांचे जागतिकीकरण असा होतो 

श्रीधर तिळवे नाईक 











भूमिका आत्ताच घेतली पाहिजे 

अशी थोडीच सक्ती आहे 

मतदान करताना ती घ्यावीच लागते 

आणि लोक घेतातही 


बाकी सभा गर्दी भाषणाची गुणवत्ता 

तर ठाकरेंनी बाजी मारली हे स्पष्टच आहे 

पण वाईट गोष्ट अशी कि 

काल खऱ्या अर्थाने शिवसेना फुटली 

कार्यकर्ते विभागले गेले 

ह्याचा फायदा भाजपला मिळणार हे उघड आहे 

भाजपने  ऐनवेळी युती मोडली तर शिंदे काय करणार आहेत 

कारण मराठी मते शिंदे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अशी विभागली जाणार हे स्पष्टच आहे 

आणि भाजपला हेच तर साधायचं होतं 


आता हे अंगाशीही येऊ शकतं 

म्हणजे जर दोन्ही काँग्रेस जर एकत्र आल्या 

ज्याची दाट शक्यता आहे 

आणि लोक भाजपवर नाराज आहेत 

तर सगळे हिंदुत्ववादी आपापसात लढून हरले 

आणि सेक्युलर जिंकले 

असं होऊ शकतं 


शरद पवार म्हणूनच पाहतायत 


ह्या सगळ्यात आपला महाराष्ट्रात शिरायला चांगलाच चान्स आहे 

अनेकरंगी लढतीत आपचे किमान दहा आमदार तरी निवडून येतील असं वाटतं 

आणि लोक सगळ्यांनाच विटले असतील तर किमान ५० 


आपने महाराष्ट्राच्या सर्व जागा लढवाव्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत 

श्रीधर तिळवे नाईक 

शिंदे फ्लॉप व्हावेत व सतत भाजपवर अवलंबून राहावेत हाच गेमप्लॅन असेल तर --


क्रांतिकारी हिंदुत्ववाद , मेनस्ट्रीमचा प्रश्न , बहुजनवाद , नामदेव ढसाळ आणि सुषमा अंधारे श्रीधर तिळवे नाईक 

सुषमा अंधारे ह्या शिवसेना( टी )ठाकरे च्या सध्या प्रवक्ता म्हणून काम करतायत आणि शिवसेना (बी ) च्या विरोधात उभ्या ठाकतायत ह्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे नामदेव ढसाळांनी शिवसेनेत प्रवेश केला किंवा शिवसेनेशी युती केली (नेमके काय हे विवादास्पद आहे )तेव्हाही सर्वांना असाच धक्का बसला होता ह्यामागची कारणे मात्र ढसाळांना स्पष्ट करता आली नाहीत आणि मग दलित समाजाने त्यांना माफ केले नाही पुढे त्यांचे सहकारी रामदास आठवले ह्यांनीही काँग्रेस शिवसेना आणि शेवटी भाजप बरोबर युती  करून सगळ्यांना धक्का दिला ढसाळ ह्यांच्या पत्नी मल्लिका अमरशेख ढसाळ ह्यांनीही शिवसेनेशी युती केली होती ह्या सगळ्याचे समर्थन कसे करायचे हा प्रश्न कायमच अनेकांना पडला आहे म्हणून हा लेखनप्रपंच 

मी २०१४ पर्यंत फुले आंबेडकरवादी होतो हे  मी कधीच लपवलेलं नाहीये मात्र मी पारंपरिक फुले आंबेडकरवादी नाही हे सातत्याने सांगत आलोय आमची पिढी राजकीय व सामाजिक पातळीवर जेव्हा ऍक्टिव्ह झाली तेव्हा तिच्यापुढे प्रस्थापित व्यवस्था म्हणून काँग्रेस होती आणि ह्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध क्रांती करायला उत्सुक दोन गट होते १ साम्यवादी क्रांतिकारक २ आंबेडकरवादी क्रांतिकारक ३ ऑक्टो १९५८ ला रिपब्लिकन पार्टी फुटली आणि फुटतच गेली पण काँग्रेसमध्ये जशी राष्ट्रीय पाठींबा असलेल्या नेत्यांची फळी होती अशी फळी आंबेडकरांनी न उभारल्याने (त्यांना ती उभारता का नाही आली हा वेगळा लेखविषय आहे ) ह्या फाटाफुटीतुन  एकही फळी मुख्य जहाज बनली नाही ह्यातून साठोत्तरी दलित पीढीला प्रचंड फ्रस्टेशन यायला लागले धर्मातरानंतर स्थिती किती बदलली असा प्रश्न निर्माण झाला कारण धर्मांतरानंतर जी प्रतिष्ठा मिळेल अशी अपेक्षा होती ती फोल ठरली होती  

साहजिकच साठोत्तरी आंबेडकरवादी क्रांतिकारकांनी नवा विचार करून बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टीच्या प्रबोधनात्मक रूपाचे नूतनीकरण घडवून दलित पॅन्थर उभी केली जी ठिकठिकाणी उठाव करत होती हे उठाव तुरळक यशस्वी झाले व अनेक ठिकाणी दलित पँथरच्या कार्यकर्त्यांवर केसेस पडल्या पुढे नामदेव ढसाळ ह्यांनी इंदिरा गांधींची भेट घेऊन ह्या केसेस काढून घेण्याची त्यांना विनंती केली व रातोरात ह्या केसेस काढून घेण्यात आल्या ह्याच काळात इंदिरा गांधींना पाठींबा म्हणून ढसाळांनीं प्रियदर्शिनी एक पात्र ही कविता लिहिली ह्याच काळात राजा ढाले ह्यांना असं वाटायला लागलं कि नामदेव ढसाळ दलित पॅन्थर कम्युनिझममध्ये विलीन करायला निघालाय आणि त्यांनी नामदेव ढसाळांना दलित पँथरमधून बाहेर काढण्याचे ठरवले वास्तविक ढाले काही पँथरचे संस्थापक न्हवते ते स्थापनेनंतर ११ महिन्यांनी आले होते तरीही त्यांचा प्रभाव पडला व पॅन्थर फुटली ज्या काँग्रेसच्या विरोधात आंबेडकर आयुष्यभर लढले त्या काँग्रेसशी युती नाकारणे गरजेचे आहे असं वाटणारा एक गट दलितांच्यात पूर्वीपासून होताच किंबहुना रिपब्लिकन्स काँग्रेसबरोबर युती करतायत हाच तर प्रॉब्लेम होता वास्तविक घडत काय होते ? 

नामदेव ढसाळ हे दलित पँथरचे पहिले असे विचारवंत होते ज्यांना आपण मेनस्ट्रीममध्ये सामील व्हायला हवे असे वाटत होते आणि ते ह्या दृष्टीने चाचपणी करत होते ह्या काळात त्यांना काँग्रेस ही इंदिरा गांधींच्यामुळे समाजवादी झालीये असं वाटत असल्याने ह्या बदललेल्या काँग्रेसबरोबर युती करावी अशा मूडमध्ये ते आले होते आणि त्याच हिशेबाने प्रियदर्शिनी आली होती पुढे जनता सरकार आल्यावर आणीबाणीला पाठींबा देणाऱ्या सर्वच लोकांची पंचाईत झाली वास्तविक आणीबाणीला पाठींबा द्यायला जी धोटे (फॉरवर्ड ब्लॉक ) ढसाळ (आंबेडकरवादी दलित पॅन्थर ) व बाळासाहेब ठाकरे (शिवसेना हिंदुत्ववादी  ) ह्यांची सभा घेण्याचे घालायला लागले  तेव्हाही  कम्युनिस्ट आसपास न्हवते मात्र कम्युनिस्टांना दलित पॅन्थर हायजॅक करायची आहे अशी अफवा वातावरणात होती त्यामुळे राजा ढाले म्हणतात ते सत्य आहे असे अनेकांना वाटायला लागले 

पुढे इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या पण ढसाळांना आवश्यक ते बदल घडेनात आणि बदललेल्या काँग्रेसला मेनस्ट्रीम मानून राजकरण करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आणि ढसाळनिष्ठ  फुले आंबेडकरवादी लोकांच्यात एक चलबिचल सुरु झाली कम्युनिस्ट पार्टी ही मेनस्ट्रीम बनण्याची शक्यता धुळीस मिळाली होती काँग्रेस जी मेनस्ट्रीम म्हणून ढसाळांनी निवडली ती दलितांना धूपपण घालायला तयार न्हवती अशावेळी एकच कम्युनिस्ट व काँग्रेसी नसलेली  तिसरी मेनस्ट्रीम अव्हेलेबल होती ती म्हणजे हिंदुत्व ! हिंदू महासभा व पुढे जनसंघ ह्यांचेही राजकारण कम्युनिस्ट व काँग्रेस ह्यांच्याविरुद्ध होते प्रश्न असा होता कि आंबेडकरवाद्यांनी हिंदुत्वात उडी मारावी का ? नामदेव ढसाळ ह्यांनी ह्याबाबत तळ्यात मळ्यात करायला सुरवात केली ते कोणतीही भूमिका घ्यायला तयार न्हवते कारण काँग्रेस नको कम्युनिस्ट नको तर मेनस्ट्रीममध्ये सामील व्हायचं तर हिंदुत्व हाच पर्याय उरत होता  ह्या काळात हिंदुत्वाचे दोन ठळक पर्याय उपलब्ध होते 

१ संघवादी हिंदुत्व 
२ प्रबोधनकार ठाकरेवादी हिंदुत्व 


आणि नामदेव ढसाळांना हे दोन्ही पर्याय पर्याप्त वाटत न्हवते कम्युनिझमप्रेम कमी होत न्हवते आणि काँग्रेस खुणावत होती 

मला हे तळ्यात मळ्यात करणे आवडणे शक्यच न्हवते कारण माझ्याभवती राजकुमार यादवांच्यापासून सुजित मिणचेकरपर्यंत राजकारणात रस असलेले तरुण व कुमारवयीन लोक वावरायला लागले होते ह्याचवेळी आमच्या आझाद चौकात  रामभाऊ फाळके ह्यांनाही शिवसेनेच्या ऑफर्स मिळायला सुरवात झाली होती आणि त्यांनाही एक क्लॅरिटी हवी होती अशावेळी एक ठाम भूमिका घेणे आवश्यक होते शैवीझम सुरवातीपासूनच सोबत होता पुढे त्यात आंबेडकर ऍड झाले होते 

आंबेडकरवादाबाबत माझं स्वतःचं एक निरीक्षण असं होतं कि आंबेडकरवाद हा आरंभापासूनच एका मेनस्ट्रीमवर अवलंबून होता खुद्द फुले आणि आंबेडकर हे ब्रिटिश काळात असलेल्या ब्रिटिश मेनस्ट्रीमच्या युतीत होते आणि ब्रिटिश गेल्यानंतर अशी मेनस्ट्रीम काँग्रेस होती जिच्याबरोबर बाबासाहेब गेले पण पुन्हा बाहेर पडले अशावेळी एक जबाबदारी असते ती म्हणजे स्वतःलाच मेनस्ट्रीम बनवायची बाबासाहेबांनी ती जबाबदारी घेतली त्यासाठी त्यांनी साक्षात धर्म बदलला नव्याने रिपब्लिक पार्टी संघटित केली पण त्यांचे निधन झाले आणि स्वतःला मेनस्ट्रीम बनवण्याची जबाबदारी नंतरच्या नेत्यांवर आली त्यांना ती झेपली नाही बहुजनवाद हा का मेनस्ट्रीम बनत नाही ह्याची साधी चिकित्सा सुद्धा ह्या लोकांनी केली नाही पुढे दलित पँथरलाही मेनस्ट्रीम बनता आले नाही त्यामुळे साहजिकच  आता आपण मेनस्ट्रीममध्ये पुन्हा उडी मारू इच्छितोय तर नीट विचार करून मारूया असं काही माझं चाललं होतं मला कम्युनिस्ट किंवा समाजवादी नको होते कारण अच्युत पटवर्धनांचा अपवाद वगळता ह्या दोघांनीही मोक्षाला स्पष्ट नकार दिला होता काँग्रेसने मोक्षाला पाठींबा देणारा गांधीवाद नेहरूंच्याच काळात लोकायतवादी भूमिका घेऊन नाकारला होता आणि स्वतःचे नैतिक अधःपतन घडवायला सुरवात केली होती आणि आंबेड्करच असे होते ज्यांनी मोक्षसादृश्य का होईना पण बुद्धाचे निब्बाण स्वीकारले होते जे ढसाळांनीही स्वीकारायला सुरवात केली होती माझ्यासाठी मोक्ष हा नैतिकतेचा कणा होता व आहे त्यामुळे मोक्ष डावलणाऱ्या कुणाबरोबरही जाण्याची माझी तयारी न्हवती साहजिकच ह्या काळात मोक्ष स्वीकारणारे दोनच मुख्य प्रवाह होते १ हिंदुत्ववादी २ आंबेडकरवादी आणि ते त्या काळात कसे एकत्र आणता येईल हा माझ्यापुढचा प्रश्न होता तरुण असल्याने देश बदलण्याची झिंग होती आणि त्याकाळात एक निश्चित पोलिटिकल स्टान्स घेणे मला कलावंत म्हणून खूप आवश्यक वाटत होते पोलिटिकल कवितेचं अजीर्ण मला त्यावेळी न्हवतं आणि त्याबाबत मला नामदेव ढसाळ त्याकाळी आदर्श वाटत होते मी त्यांच्यावर स्वतंत्र पुस्तक लिहिण्याचे कारण हेच होते 

पॅन्थर फुटल्यावर साहजिकच आता आंबेडकरवादच मेन स्ट्रीममध्ये विलीन करायचा कि नाही ? करायचा तर कसा असा प्रश्न आला होता माझे म्हणणे असे होते कि काँग्रेसबरोबर जायचेच नसेल आणि हे करायचेच असेल तर आपण आंबेडकरवाद केंद्री ठेवून आणि फुल्यांचा सत्यशोधक शाबूत ठेवून नवा क्रांतिकारी हिंदुत्ववाद निर्माण करूया ह्यासाठी आवश्यक असलेले पूर्वज सुदैवाने प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या रूपाने आहेत ज्यांनी उघडउघड स्वतःला फुलेवादी म्हणवून घेतले आहे आणि शैवांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज त्यांचेही आदर्श आहेत अशावेळी शिवाजी महाराज , महात्मा फुले प्रबोधनकार ठाकरे व बाबासाहेब आंबेडकर अशी चौकोनी  घेऊन आपण वाटचाल करू शकतो मी ह्याला क्रांतिकारी हिंदुत्व म्हंटले होते मी फुले आंबेडकर हिंदुत्वात बुडवायला चाललोय अशी त्यावेळी कोल्हापुरात माझ्यावर टीका व्हायला लागली होती ह्या काळात रामभाऊ फाळके शिवसेनेकडून लढले आणि महापौरपदाची इलेक्शनही लढले 

दुर्देवाने पुढेही ढसाळांचे तळ्यात मळ्यात कायमच राहिले कारण त्यांना आवश्यक असलेली प्रतिष्ठा त्यांना शिवसेनेने कधीही दिली नाही शिवसेनेला संजय निरूपमसारखा माणूस राज्यसभेत पाठवावावासा वाटला पण ढसाळ पाठवावेसे वाटले नाहीत किंवा नंतरही अविनाश धर्माधिकाऱ्यांनाही ते शिवसेनेत येऊनही पाठवावेसे वाटले नाही माध्यम दर्जाच्या स्वार्थबुद्धी लोकांची निवड करायची आणि बुद्धिमान लोकांना डावलायचे आणि मग स्वार्थबुद्धी असलेल्या लोकांनी बंड केले कि ही आपलीच निवड आहे हे विसरून शिव्या घालायच्या ही शिवसेनेची परंपरा !  तरीही ढसाळांनी  शिवसेनेशी युती करून हिंदुत्वाशी सहकार्य करायला सुरवात केली होती कारण मेनस्ट्रीम ही त्यांची गरज होती आणि दलितांचीही ती गरज आहे असे त्यांना वाटत होते 

पुढे आमच्या  ग्रुपमधले सुजित मिणचेकरांना (त्यांच्यासाठी मी अभिजित पानसेकडे शब्द टाकला होता )मात्र उद्धव ठाकरे ह्यांनी तिकिट दिले आणि त्यांनी तीनवेळा इलेक्शन लढवली दोनदा जिंकले एकदा हरले 

२००० नंतर माझा  तथाकथित उच्चवर्ण सगळ्याच आंबेडकरवाद्यांना  खटकायला लागला आणि माझ्या लक्ष्यात आले कि आपण कितीही प्रयत्न केला तरी हे लोक आपण उच्च वर्णात जन्म घेतला म्हणून आपल्याला माफ करणार नाहीत आणि सामावून घेणार नाहीत माझ्या ह्या काळातल्या मनःस्थितीचे प्रतिबिंब मी लिहिलेल्या जोशी कि कांबळे ह्या चित्रपटात आहे तथाकथित उच्चवर्णीय माणसाने ह्या देशात आंबेडकरवादी होऊन चालत नाही त्याला गांधीवादी किंवा बसवेश्वरवादी व्हावं लागत हे माझे ह्या काळातले शहाणपण आहे गांधीवादाशी माझा एकच प्रॉब्लेम होता व आहे तो म्हणजे गांधीवाद नववैष्णववादी आहे आणि गांधीवादात कधीही मनुस्मृतीचे कमबॅक होऊ शकते आणि त्यामुळे वर्णजातव्यवस्था आणि स्त्रीपुरुष भेदही परतू शकतात ! विनोबा भावेंनी मनुशासनम (निवडक मनुस्मृती )नावाचे पुस्तक लिहिलंय हे मी विसरू शकत नाही साहजिकच ह्या काळातच मी हळूहळू पुन्हा बौद्धकेन्द्री आगमवादाकडून शैवकेंन्द्री आगमवादाकडे परतायला सुरवात केली कारण बौद्ध बहुजनांचा धर्म होणार नाही हे स्पष्ट झाले होते व शैव हाच आता बहुजनांच्यापुढचा एकमेव पर्याय आहे अशी माझी धारणा झाली होती व आहे २०१४ ला माझे सर्वकाही बदलले हेही असो 

ह्या काळात गोव्यात काय घडत होते तेही पाहणे बहुजनवादाच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे .  गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी ही बहुजनवादी पार्टी मेनस्ट्रीम बनली कारण गोव्यात असलेला शिवमंदिरांचा व शैवांचा  महामेळावा व  बहुजनांसाठी भाऊसाहेब बांदोडकर ते माझे मामा रोहिदास नाईक ह्यांच्यापर्यंत अनेकांनी उपसलेले कष्ट !  पण मग गोव्याची एव्हढी प्रगती करवून व त्याला भारतात २ नंबरचे राज्य बनवूनही ही पार्टी नंतर गोव्यात का मेनस्ट्रीम राहिली नाही ? बहुजन आपल्याच पार्टीविरोधात का उभे ठाकले ? ह्याचे कारण सोनिया काँग्रेसनेच बहुजनांच्यात ख्रिश्चन व हिंदू अशी धार्मिक फूट पाडली त्यासाठी कोकणी मराठी वाद चिघळवला ह्यातून व्हायचे तेच झाले हिंदू बहुजन असुरक्षित झाला व  भाजपमागे गेला अशीच असुरक्षितता शाहबानो प्रकरणाच्या निमित्ताने हिंदूंच्यात निर्माण केली गेली आणि हिंदू बहुजन राम मंदिरचे निमित्त होऊन भाजपमागे गेले आणि आज काय स्थिती आहे ? तर गोव्यात एकेकाळी सिंह असणारा मगो पक्ष भाजपबरोबर युतीत गवत चरतो आहे कारण त्याची ताकद असणारा बहुजन समाज हा आता भाजपबरोबर आहे . प्रश्न असा आहे कि महाराष्ट्रात शिवसेनेमागे असलेला बहुजन समाज आता भाजपमध्ये असणाऱ्या बहुजनांमागे जाणार कि पवार ठाकरे युतीमागे जाऊन त्यांना विजयी करणार ?

ह्यापुढचा प्रश्न असा आहे कि हे फक्त भारतात घडलंय कि जगभर घडलंय ? तर हे जगभरच घडते आहे आणि ह्याची सुरवात आधुनिकतेत महम्मद अली जीना व उत्तराधुनिक काळात अयातुल्ला खोमेनी ह्यांनी केली होती 

साहजिकच ह्या देशातल्या बहुजनाला धार्मिक बनवण्यात भारतीय उत्तराधुनिकतेला कमालीचं यश मिळणार होतं ते मिळालंय खरतर जगभरच हा उद्योग उत्तर आधुनिकतेनं केला आहे आणि त्याचा परिणाम ओशो रजनीशांनी जिझसवर टीका केली म्हणून त्यांना अमेरिकेतून हाकलून देण्यात झाला होता जर अमेरिकेची ही अवस्था तर मग भारताचा काय पाड ? ह्याविरोधात लढायचे असेल तर चौथ्या नवतेशिवाय पर्याय न्हवता आणि ही चौथी नवता राजकारणात कशी वापरायची हा माझ्यापुढचा प्रश्न होता प्रश्न होता कुठली मेनस्ट्रीम चौथी नवता स्वीकारेल ? आश्चर्यकारकरित्या आंबेडकरवाद्यांनी ह्याबाबत धोबीपछाड खाल्ला आणि भाजपाई हिंदुत्ववाद प्रमोद महाजनांच्यामुळे पुढे गेला  

भाजपमागे गेली काही वर्षे सातत्याने बहुजन गेल्याने आणि भाजपने गोपीनाथ मुंडे ते नरेंद्र मोदी ह्यांच्यापर्यंत सर्व पदे बहुजनांना दिल्याने भाजपबाहेर बहुजनवाद मेनस्ट्रीम होण्याचे चान्सेस हळूहळू इतिहासजमा व्हायला लागले आणि ह्यात खरा प्रॉब्लेम दलितांचा आणि आंबेडकरवाद्यांचा झाला आणि नामदेव ढसाळ अधिकाधिक रिलेव्हंट होत गेले . 

आजतरी नामदेव ढसाळांनी उपस्थित केलेला हा मेनस्ट्रीमचा प्रश्न सुटलाय का ? ढसाळांचा मुद्दा क्षणभर असं मानू कि चुकीचाच होता तर मग  ढसाळांना सोडून इतरांनी स्वतःची मेनस्ट्रीम निर्माण केली का ? स्वतः काहीच निर्माण करायचं नाही आणि ढसाळांना शिव्या द्यायच्या हे चालणार नाही अगदी मायावतींनाही भाजपबरोबर युती करावी लागली आहे हे लक्ष्यात घेण्यायोग्य आहे आणि ही युती तुटल्यावर त्या हळूहळू  झिरो होत जातांना दिसतायत महाराष्ट्रात रामदास आठवलेंनीही भाजपमध्ये उडी मारली कारण त्यांनाही मेनस्ट्रीमशिवाय पर्याय नाही असे वाटते आणि निवडून येऊ शकणारा किंवा आलेला ही त्यांची उडी मारण्याची कसोटी आहे कारण दलित फक्त सत्ता असलेल्यांना मान देतात असा त्यांचा निष्कर्ष आहे 

प्रश्न असा आहे कि मग आजचे काय ? आज स्थिती अशी आहे कि  कम्युनिस्टांचा मेनस्ट्रीम प्रवाह होणार नाही हे स्पष्टच आहे काँग्रेस विखुरलीये आप नवी पार्टी आहे अशावेळी पुन्हा भाजपचे किंवा प्रबोधनकारांचे हिंदुत्वच महाराष्ट्रात मेनस्ट्रीम म्हणून उरते . सुषमा अंधारे ह्या नामदेव ढसाळ ह्यांच्यासारख्याच आयडेंटिटी क्रायसिसमध्ये सापडल्या असाव्यात मात्र ढसाळांचासारख्या त्या तळ्यात मळ्यात करत बसल्या नाहीत किंवा त्या ढसाळांच्याप्रमाणे शिवसेनेशी युतीही करत बसल्या नाहीत त्या थेट शिवसेनेत दाखल झाल्या प्रश्न असा आहे कि निदान त्यांची तरी शिवसेनेत कदर होणार कि त्यांनाही नामदेव ढसाळांच्याप्रमाणे अविनाश धर्माधिकारी ह्यांच्याप्रमाणे वापरून सोडून दिलं जाणार ? सध्या तरी त्यांचा मानसन्मान ठेवला गेलाय असं दिसतं ढसाळांच्याप्रमाणे त्यांच्याकडेही आक्रमक नेतृत्व व वक्तृत्व आहे आय होप त्या शिवसेनेसाठी असेट ठरतील 

बाकी बहुजनवाद मेनस्ट्रीम बनण्याचा प्रश्न तर सध्या तरी बहुजन हर हर महादेव म्हणणाऱ्या मोदी ह्यांच्यामागे जाताना दिसतोय मात्र त्याच्यात आर्थिक गोष्टींच्यामुळे अलीकडे निराशा यायला लागलीये ही निराशा कॅश करून घ्यायला जी राजकीय प्रतिभा लागते ती सध्या कुणाकडे आहे असं दिसत नाही अशी प्रतिभा मोदींनी २०१४ साली दाखवली होती त्यापध्दतीचा चमत्कार घडवण्याची ताकद ज्याच्याकडे असेल तो विजयी हे २०२४ चे चित्र असेल 

श्रीधर तिळवे नाईक 

ह्याचा अर्थ एकच अजूनही उद्धव ठाकरेंच्या बळाचा आणि शिंदे गटाच्या हालचालीमुळे झालेल्या राजकीय परिणामांचा महानगर पालिका निवडणुकीवर काय परिणाम झालेला आहे ह्याचा कुणालाच अंदाज येत नाहीये शिवाय ठाकरे ह्यांना मिळणारी सहानुभूतीची लाट ओसरणे आवश्यक आहे असं प्रत्येकाला वाटतंय आणि सर्वात शेवटी पराभूत होऊन पुढच्या पराभवाला कोण चालना देईल हे म्हणजे फुकट खर्च करून शहाणपण विकत घेण्यासारखं झालं असतं सर्वच बरोबर आहेत फक्त उद्धव ठाकरे ह्यांना मिळणारा १ प्लस चा आडवावांटेज आता फिका होईल 
श्रीधर तिळवे नाईक 















Thursday, March 16, 2017

कुठलाही मराठी माणूस दिल्लीत मोठा होणार म्हंटलं कि इतर मराठी राजकारणी लोकांची तोंडे झालीच वाकडी ! ह्यांना काय भाजपमध्ये दुसरा लायक माणूस मिळाला नसता का ? पण ह्यांचे इगो मोठे ह्यांना संरक्षण मंत्र्याच्या हाताखाली मंत्री व्हायचे आहे आलतूफालतू माणसाच्या हाताखाली नाही . शरद पवार प्राईममिनिस्टर झाले तर ह्या विचाराने ह्यांच्या पोटात गोळा ! शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेला विरोध करणारे हेच ! पहिल्या बाजीरावाचे   , होळकर शिंद्यांचे पाय खेचणारे हेच . आपल्या माणसाने टोपलीत महाराज व्हावे पण दिल्लीत नाही . ढसाळ नोबल मिळवू शकतात म्हंटल्यावर ह्यांनीच त्यांची निंदा चालू केली . परिणाम गेल्या पांच हजार वर्षात दिल्लीवर मराठी माणसाचे राज्य नाही . नतद्रष्टपणाचे नोबेल असेल तर ते प्रथम मराठी समाजाला मिळेल . परिकर तुमच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला गल्लीत आणल्याबद्दल समस्त गोवेकरांच्यावतीने मी तुमची माफी मागतो .
श्रीधर तिळवे -नाईक 
राजाच्या कपड्याची किंमत बघता तसे वाटत नाही आणि आपले लोक असे कि कपडे बघून आणि झेंडे बघून मत बनवतात आणि देतातही 

Friday, February 24, 2017

चेहरा आणि निवडणूका श्रीधर  तिळवे नाईक

मुख्य मुद्दा तुमच्याकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ह्यासाठी कोणता चेहरा आहे हाच असतो . भारतात संसदीय पद्धतीची अध्यक्षीय राजवट चालते . आणि ह्या वेळी भाजपकडे पंतप्रधानासाठी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणीस असे दोन ठाम चेहरे होते . काँग्रेसचा राहुल गांधी हा चेहरा आणि बहुजन पार्टीचा मायावती हा चेहरा जनतेने पूर्ण नाकारला आहे . जनतेला हे चेहरे खात्रीशीर वाटत नाहीयेत . काँग्रेसकडे असलेला मनमोहसिंग हा चेहरा ( तो खूप म्हातारा आहे हे मान्य असूनही )निदान येऊ घातलेल्या निवडणुकीत तरी पुढे आणावा सोनियांनी आपले पुत्र प्रेम बाजूला काढून ठेवावे अन्यथा काँग्रेस बुडणे अटळ आहे . बाळासाहेब ठाकरे हा शिवसेनेचा ठाम आणि पक्का चेहरा होता आणि बाळासाहेबांनी पुढचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे ह्यांची निवड केली आणि तिथेच राज ठाकरेंचे राजकीय भविष्य सीलबंद झाले . शिवसेनेला उद्धव ठाकरे हा स्थिर चेहरा प्राप्त असल्यानेच मुंबईत आणि ठाण्यात यश मिळाले . रिपब्लिकन आणि कम्युनिस्ट ह्यांना ह्या देशात कधीही राष्ट्रमान्य चेहरा मिळालेला नाही आणि चेहरा नसलेला पक्ष ह्या देशातील जनतेला चालत नाही (अपवाद बंगाल मध्ये ज्योती बसू व केरळ ). जयप्रकाश नारायण हा जनता पक्षाचा चेहरा होता म्हणून इंदिराजी हरल्या पण ह्या चेहऱ्याचा लय होताच पुन्हा एकचेहरी विजयी झाल्या . पुढे राजीव गांधी , सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग ह्या चेहऱ्यांनी काँग्रेस वाचवली चेहरा असेल तरच तुमचे फेसबुकिंग , व्होटबुकिंग  आणि फेसबुकही वाढते . शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर स्वतःचा वेगळा चेहरा निर्माण करण्यात पूर्ण अपयशी झालेत आणि त्यांची त्यांच्या पूर्वीच्या चेहऱ्याची पुण्याई संपत चाललीये आणि सुप्रियाताईंना स्वतःचा वेगळा चेहरा निर्माण करण्यात अपयश आलंय . अजित पवार आणि राहुल गांधी एकाच माळेचे मणी आहेत . ह्या देशातील आणि बहुदा कुठल्याही देशातील जनतेला अमूर्तात व्होटिंग करण्याची इच्छा नसते भाजपचा विजय हा नरेन्द्र मोदी आणि देवेंद्र फडणीस ह्या ठामपणे देण्यात आलेल्या आणि ठामपणे वावरणाऱ्या चेहऱ्यांचा विजय आहे हा देश मुर्तीपुजकांचा देश आहे आणि निवडणुकीत त्याला पक्षमूर्ती लागतात भाजपकडे अशा पक्षमूर्ती आहेत आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे . अध्यात्मिक लोकांनी राजकारणावर शक्यतो भाष्य  करू नये अशी वहिवाट आहे ती मोडल्याबद्दल सर्वांचीच क्षमा मागतो .
श्रीधर तिळवे नाईक
DATE 25 FEB 2015




Sunday, October 30, 2016

शशिकला काकोडकरांच्या मृत्यूचा धक्का पचवतो न पचवतो तोच पळशीकरांच्या मृत्यूची बातमी आली .

गांधीविचाराची चार  स्कुल्स आहेत
१ काँग्रेसवाद
२ कर्मठ गांधीविचार
३ मुक्त गांधीविचार
४ सर्वोदयवाद
पळशीकर हे तिसऱ्या मुक्त गांधीविचार स्कुलचे साठोत्तरी विचारवंत होते सर्वांना सोबत घेऊन जाणे,  पारंपरिक लोकांना पेचात टाकण्याऐवजी त्यांना नाजूक  हातांनी परंपरेतून बाहेर काढणे ही गांधींची वैशिष्ट्ये ह्या स्कुलमध्ये असतातच पण जिथे गांधी मागासलेले वाटतात तिथे त्यांचा हात सोडून पुढील दिशेने पाहणे हेही ह्या स्कूलमध्ये घडते पळशीकरांची  वैचारिक वाटचाल ही ह्या स्कूलला समृद्ध करणारी होती

त्यांचा माझा परिचय हा ''नवभारत'' मध्ये १९९९साली त्यांनी संपादक म्हणून '' श्रीधर तिळवे :मराठीचा पहिला पोस्टमॉडर्न कवी'' हा लेख छापायला घेतला तेव्हा झाला मी पोस्टमॉडर्न च्या कट्टर विरोधात असूनही ज्याचे त्याचे वैचारिक स्वातंत्र्य म्हणून छापू दिला प्रत्येक संदर्भाची खातरजमा करत त्यांनी तो छापला मात्र ह्या निमित्ताने ते संपादक म्हणून किती चोखंदळ आहेत हे कळून चुकले .

ते केवळ चोखंदळ न्हवते तर सर्वसमावेशक  आणि समग्र पाहणारे होते अनेक साठोत्तरी विचारवंतांचा आखूडशिंगीपणा त्यांच्यात न्हवता . उलट मोकळ्या संवादावर त्यांचा विश्वास होता फक्त अकॅडेमिक विचारवंतांना कवटाळण्याऱ्या महाराष्ट्रात त्यांचे लेखन दखलपात्र झाले हेच मुळी आश्चर्य ! ते कुणी ना कुणी समग्र स्वरूपात प्रकाशित करणे गरजेचे आहे साठोत्तरी पिढीचे अनेक वैचारिक धाग्यांचे ताणेंबूणे  त्यातून स्पष्ट होतील नेमाडेंच्या देशीवादातील परंपरेपेक्षा त्यांचा परंपरेबाबतचा विचार हा महाराष्ट्राला अधिक पुढे न्हेणारा आहे . केवळ झंझावाती लेखन करण्याऱ्यांना कवटाळण्यापेक्षा पळशीकरांसारख्या मृदू विचारवंतांनाही प्रतिसाद देणे हे आवश्यक आहे ,
त्यांना नमस्कार करण्याचीही माझी लायकी नाही तरीही त्यांना माझा शेवटचा नमस्कार ! जय नवभारत !

श्रीधर तिळवे नाईक


Tuesday, September 27, 2016

समाज श्रीधर तिळवे नाईक 



समाज श्रीधर तिळवे नाईक