नरहर कुरुंदकर : डेमोक्रेटिक पोस्ट सोशॅलिझम चा एक मुख्य अर्ध्वयू २ मनुस्मृती :सत्य शोधणे श्रीधर तिळवे नाईक
मनुस्मृती भारतातील कदाचित सर्वात वादग्रस्त पुस्तक आहे आणि कुरुंदकरांचे तिच्यावरील लेखन हे एक सर्वश्रेष्ठ लेखनापैकी एक आहे विशेषतः भाजपमुळे मनुस्मृती पुन्हा चर्चेत आली आहे
भारतीय इतिहासात मनुस्मृती फार महत्वाची आहे ती प्राचीन कारणांमुळे न्हवे तर अर्वाचीन कारणांमुळे ! ब्रिटीशांच्यापूर्वी वैदिक राजवटी सोडल्या म्हणजे उत्तरपेशवाई सोडली तर ज्या शैव वा ब्राम्हणेतर राजवटी होत्या तिथे कुठेही मनुस्मृतीची राजवट अस्तित्वात न्हवती वैदिक राजवटीतही मनुपेक्षा याज्ञवल्क्य स्मृतीलाच जास्त महत्व होते
दुर्देवाने ब्रिटिश काळात १७९४ साली मनुस्मृतीचा अनुवाद झाला व तिला प्रमाण मानून ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला आणि अख्खा भारत मनुस्मृतीनुसार चालत होता असा गैरसमज पसरला ह्याला कारण उत्तरपेशवाई होती जी मनुस्मृतीनुसार चालत होती आणि ब्रिटिशांची अंतिम लढाई ह्या उत्तरपेशवाईशी झाल्याने इंग्रजांना असे वाटले कि उत्तरपेशवाई ज्या कायद्याच्या आधारे चालत होती त्याच कायद्याच्या आधारे भारत चालत असणार
जे हजारो वर्षे ब्राम्हणांना जमलं नाही ते ब्रिटिशांनी एका तडाख्यात केले खरेतर ह्या एका कारणासाठी फुले ह्यांनी ब्रिटिश राज्य नाकारले असते तरी चालले असते पण झाले नेमके उलटे ! फुल्यांनीही असाच समज करून घेतला कि महाराष्ट्र मनुस्मृतीनुसार चालत होता म्हणजे भारत मनुस्मृतीनुसार चालत होता आणि हा गैरसमज फुल्यांच्याकडून आंबेड्करांच्याकडे पास झाला वास्तविक ह्या लोकांनी होळकरांना आणि त्यांच्या राजवटींना डोळे उघडून पाहिले असते तरी त्यांना मनुस्मृती ही राज्यकारभार चालवत होती हे प्रमाण मानण्यातला मूर्खपणा कळला असता असो ब्रिटिशांच्यामुळे आणि फुले आंबेड्करांच्यावर पडलेल्या ब्रिटिश प्रभावामुळे बहुजनांच्या बोडक्यावर उगाचच अंगापेक्षा बोन्गा जास्त झालेली ही मनुस्मृती पडलेली आहे
शिवाजी महाराजांनी मनुस्मृती वाचली तरी होती काय ? वाचणं जाऊ द्या शिवाजी महाराजांना मनुस्मृती माहित तरी असावी का हा मला प्रश्न पडतो . असो . ब्राम्हणांना शंख छान वाजवता येतात एव्हढेच त्यातून कळते
मागील लेखात आपण कुरुंदकरांच्या मेथडॉलॉजीची आणि त्यांच्या सॉक्रेटिस , शेजवलकर व आगरकर ह्यांच्याशी असलेल्या संबंधाची चर्चा केली मनुस्मृती : एक विचार ह्याही ग्रंथात कुरुंदकर हीच मेथडॉलॉजी वापरतात
मी मागेच म्हंटल होतं कि महाराष्ट्र हा चार उपसंस्कृतीतून वाहता राहतो
१ अपरान्त कोकण
२ कर्णाट दक्षिण पश्चिम महाराष्ट्र(ह्यात बेळगाव खानापूर निपाणीही येते )
३ मराठवाडा
४ विदर्भ(ह्यात दक्षिण मध्यप्रदेश येतो )
कुरुंदकर हे मराठवाड्यातून आले होते आणि नांदेड ही त्यांची कर्मभूमी होती आणि ते अवघ्या नांदेडचे आचार्य होते हे सर्वश्रुत आहे. मराठवाडा हा वैष्णवांचा अड्डा आहे अपरान्त व कर्णाट (दक्षिण पश्चिम महाराष्ट्र )हे शैवप्रधान आहेत (अपवाद पुणे शहर व आसपासचे परिसर जे वारकरी चळवळीमुळे वैष्णव बनले शैवांचा पंढरीनाथ पद्धतशीरपणे विठ्ठल करून मूळचे शैव मंदिर वैष्णव बनवत हे धर्मांतर घडवण्यात आले आहेआणि ज्याने वैष्णवांच्या परिणामस्वरूप उत्तरपेशवाई आणली )ह्या मराठवाडा व उत्तर आंध्र मुळे कुरुन्दकरांच्यावर घनदाट वैष्णव संस्कार आहेत आणि अप्रत्यक्षरीत्या ते सतत नवंवैष्णवांचे समर्थन करत राहतात नववैष्णववादाने मनुस्मृती ठामपणे नाकारली पाहिजे अशी कुरुंदकरांची भूमिका आहे जी ह्या सदंभात आतापर्यंतच्या गांधीजींच्या लेच्यापेच्या हिंदुवादाला एक तर्कशुद्ध ठामपणा देते
ब्राम्हणांच्या विशेषतः ब्राम्हणधर्म मानणाऱ्या ब्राम्हणांच्या दृष्टीने मनुस्मृती ही त्यांची श्रद्धा आहे खुद्द कुरुंदकरांनी श्रद्धांच्याबाबत असं म्हंटलं आहे कि
यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याला २५ वर्षे होत आलेली आहेत. एका मर्यादित अर्थाने आपले स्वातंत्र्य आता स्थिर झाले असून राष्ट्र क्रमाक्रमाने प्रौढ होऊ लागले आहे आणि त्याबरोबरच आपली लोकशाहीही प्रौढ होऊ लागली आहे. राष्ट्राच्या लोकशाहीच्या बाल्यावस्थेत निर्भयपणे ज्या चर्चा, चिकित्सा करणे आपल्याला जमले नसते त्या चर्चा आपण आता सुरू केल्या पाहिजेत. भोवताली ज्या घटना घडत असतात त्या घटनांचा सर्वागीण आणि संपूर्ण अर्थ जनतेला आकलन झालेला असतोच असे नाही. शिवाय स्मरणशक्तीही अतिशय दुबळी असते. अशा अवस्थेत वेळोवेळी आपल्या सर्व श्रद्धा पुन:पुन्हा घासूनपुसून, तावूनसुलाखून घेण्याची गरज असते. याबाबत परंपरेने चालत आलेल्या भूमिका बदललेल्या परिस्थितीत कित्येकदा बाद होतात. कित्येकदा त्यांची मर्यादा आपल्याला दिसू लागते. कधी कधी तर अगदी मुळामध्ये जाऊन पाहिले म्हणजे आपल्या श्रद्धा आणि त्यांचे आधार तपासून घेण्याची गरज निर्माण होते.
आपण समजतो तितके श्रद्धांची तपासणी करण्याचे कार्य सोपे नाही. स्वत:ला अतिशय तर्कशुद्ध आणि बुद्धिनिष्ठ म्हणविणाऱ्या मंडळींच्याही स्वत:च्या मनातील विविध श्रद्धा आणि पूर्वग्रह अशा मूलभूत तपासणींच्या आड येतात.
तेव्हा कुरुन्दकरांनाच प्रमाण मानून त्यांच्याही विचाराची चिकित्सा आपण करायला काहीही हरकत नाही
ग्रीकरोमन परंपरेचे व क्लासिसिझमचे युरोपियन लोकांना फायदा झाला आपल्याकडे मनुस्मृतीचे पुनरागमन पेशवाईत झाल्याने मनुस्मृतीचे ब्रिटिश राजवटीतील कमबॅक झाल्याने अस्तित्वात नसलेल्या इतिहासावरच जास्त चर्चा झाली आणि काल्पनिक इतिहास घट्ट झाला असो
मनुस्मृतीबाबत जे काही जीवघेणे प्रश्न आहेत त्यातील एक म्हणजे विनोबा भावे सारख्या समजूतदार माणसाला मनू शासनम हा ग्रंथ वा संकलन का रचावेसे वाटले ? हे करून आपण अख्ख्या गांधीवादाला पुन्हा मागे न्हेतो हे विनोबांना कळले नसेल ?
आणि दुसरा प्रश्न हिंदुराष्ट्रवादाची आधारशीला मनुस्मृती असणार आहे का ? हिंदुत्ववादी अनेकदा हिंदू हिंदू म्हणून टिकले त्याचे श्रेय हिंदूंच्या वर्णजातिव्यवस्थेला देतात साहजिकच कुरुंदकरांनी प्रथम त्यावरच हल्ला चढवलेला आहे कुरुंदकर म्हणतात ,
“जगाच्या इतिहासात हिंदूंच्या इतकी चिवट अशी जमात आढळणार नाही. काही प्रमाणात ज्यूंशी त्याची तुलना करून पाहता येईल... हा चिवटपणा हिंदू समाजाला एक वरदान ठरलेले आहे. बाहेरून जितका आघात होतो; तितका हिंदूंचा कर्मठपणा वाढत जातो... हिंदूंची टिकून राहण्याची शक्ती एवढी प्रचंड आहे की, कत्तली, विध्वंस अत्याचार आणि शतकानुशतकांच्या पराभवानंतरसुद्धा हा समाज टिकून राहिलेला आढळतो... सगळे सुधारक, सगळे विचारवंत पचवून, आत्मसात करून पुन्हा जसेच्या तसे शिल्लक राहण्याची हिंदू समाजाची शक्ती फार अफाट आहे... एवढा चिवट असलेला हिंदू समाज कमालीचा असहिष्णू आणि तितकाच कमालीचा निर्दय व क्रूर असूनही उदारमतवादी व सहिष्णू म्हणून ओळखला जातो!” (जागर पृ. १७१-१७६)
भारतीय इतिहासातील नरहर कुरुंदकरांचे मनुस्मृतीवरचे पुस्तक हे ह्या सर्व गोष्टींच्यामुळे महत्वाचे ठरते एकदा ही पार्श्वभूमी कळली कि कुरुंदकर काय म्हणतात ते कळणे सोपे जाते
पुराव्याचे चार प्रकार असतात
१ समकालीन पुरावा
२ उत्तरकालीन पुरावा
३ भविष्य निर्देषक पूर्वकालीन विधानांचा पुरावा
४ मरणोत्तर पुरावा
मनुस्मृतीवर लिहिताना अशा प्रकारचा पुरावा नसल्याने सगळा खेळ चिन्हात्मक झाल्याचे दिसते कुरुंदकरांचे पुस्तकही ह्याला अपवाद नाही
मनुस्मृती ही काय आहे कुरुंदकर म्हणतात
“समाज जीवनातील गुंतागुंत, हितसंबंध समजून घेण्यासाठी धर्मश्रध्द आणि धर्म `वापरणारे' यांच्यातील फरक समजून घेणे अनिवार्य आहे. गीता हा धर्मश्रद्धांचा ग्रंथ आहे, तर मनुस्मृती हा धर्म `वापरणाऱ्यांचा' ग्रंथ आहे”
कुरुंदकरांच्या संपूर्ण मांडणीत हे प्रमेय वावरतांना दिसते ब्राम्हण धर्म वापरतायत आणि धर्माच्या आधारे आपले हितसंबंध राखण्यासाठी त्यांनी स्मृती निर्माण केली असा हा व्यूह आहे त्यामुळे कुरुंदकर प्रथमच सखोलपणे इहवादी मार्क्सवादी भूमिकेतून मनुस्मृतीची चिकित्सा करतात
कुरुंदकरांच्या मते मनुस्मृती इसवीसन २०० च्या आसपास लिहिला गेला कुरुंदकरांचे हे मत सर्वमान्य आहे कुरुंदकरांच्या मते मनू हा उच्चवर्णीयांचे हितसंबंध जपणारा गुलामगिरीचा समर्थक व पुरस्कर्ता ब्राम्हणांचा पक्षपाती समर्थक असा परंपरावाद्यांचा नेता होता आणि त्याचा ग्रंथही तसाच आहे त्यामुळेच कुरुंदकर मनुस्मृती जाळण्याचे समर्थन करतात कारण त्यांच्या मते मनुची परंपरा हयात असते आणि त्यामुळेच आता ती ह्या हयात असणाऱ्या लोकांच्यापुढेच जाळली पाहिजे एका अर्थाने हा वर्तमानात हयात असलेल्या परंपरेचा मनुस्मृती जाळणे हा निषेध असतो एका अर्थाने इथंपर्यंत ते आंबेडकरांशी सहमत आहेत पण पुढे ते बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला शूद्र पूर्वी कोण होता ह्या ग्रंथातील शूद्र हे क्षत्रिय होते हा सिद्धांत नाकारतात मनुस्मृतीच्या आधारे ते शूद्रांचे नऊ गट सांगतात त्यांच्या मते फुले ह्यांनी मांडलेली ब्राम्हण ब्राम्हणेतर अशी ही अहंता नाही तर ब्राम्हण क्षत्रिय वैश्य हे आर्य व शूद्र हे अनार्य अशी ही अहंता आहे माझ्या मते ही अहंता ब्राम्हण क्षत्रिय वैश्य हे आर्य हे वैदिक धर्मीय सत्य आहे पण अनार्यांशी घुसळण सुरु झाल्यावर सर्व आर्य वैश्य हे क्षत्रिय म्हणून सामावून घेण्यात आलेत व त्यांना क्षेत्रपती बनवून अनार्य वाणी व पणी लोकांना वैश्यांचा दर्जा देण्यात आला व त्यांचा समावेश पाप योनीत करण्यात आला आणि गीता त्याचा पुरावा आहे कुरुंदकर फक्त वर्णाच्या अंगाने विचार करत असल्याने आणि योनीच्या अंगाने विचार आजवर कोणी न केल्याने हे सामाजिक सत्य व बदलावं दिसलेला नाही त्यामुळेच भारतीय जमीनदारी व सरंजामशाहीचा उत्क्रांती कशी झाली हे अनेकांना नीट कळत नाही दुसरी गोष्ट अनार्यांशी विवाह करणाऱ्या वैश्यांनाही नंतर वैश्यांच्यात व शूद्रांच्यातच ठेवले गेले आहे अनेकदा तर ब्राम्हण व क्षत्रियांनाही हीच ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच वैश्य शूद्र अतिशूद्रांच्यातही आर्यन बॉडीज आढळतात
ह्यासंदर्भातले निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे उदाहरण प्रसिद्ध आहे आर्य ब्राम्हण हे त्यांचा धर्म मोडणाऱ्या व त्या धर्माला आव्हान देणाऱ्या ब्राम्हणांनाही वाळीत टाकून शूद्र वा अतिशूद्र बनवत जर ह्या निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांनीं लग्न केले असते तर त्यांच्या संततीला आर्यांनी शूद्र किंवा अतिशूद्र बनवले असते हे आपण लक्ष्यात घेतले पाहिजे त्यांनी शैव धर्म स्वीकारून ह्यातून स्वतःची सुटका करून घेतली व नाथसंप्रदाय स्वीकारला त्यांनतर ही भावंडे वाळीत पडलेली नाहीत कारण ती आता परक्या धर्मात गेलेत हे लक्ष्यात घ्यायला हवे म्हणूनच मग ही भावंडे मोक्षाची साधनाही करू शकलेत आणि ग्रंथही लिहू शकलेत असो
शूद्रवर्ण हा अनार्यांना आत्मसात करण्यासाठी निर्माण करण्यात आला असा कुरुंदकरांचा निष्कर्ष आहे शूद्र हे तीन आर्य वर्णाचे गुलाम होते असे ते म्हणतात अनेक पुरोगामी म्हणवणारे हिंदू मनुस्मृती व गीता ह्यांच्यातील वर्णव्यवस्था ही कर्माधिष्ठित होती असा सिद्धांत मांडतात आर्य समाज ह्या सिद्धांताचा पुरस्कर्ता आहे कुरुंदकर सिद्ध करतात कि आर्यांची वर्णव्यवस्था ही कधीही कर्माधीष्ठीत न्हवती ती जन्माधिष्ठीतच होती आणि कर्मफळाचा खरा अर्थ हा कर्माप्रमाणे पुढील जन्म असा आहे म्हणजेच हा जो जन्म आहे तो तुम्हाला मागील जन्माच्या कर्माच्या आधारेच मिळाला आहे म्हणजेच ह्या जन्मी तुमचा वर्ण जन्माधिष्ठितच आहे आणि तो मागील जन्मी तुम्ही केलेल्या कर्मामुळे तुम्हाला मिळालेला आहे मी कुरुन्दकरांशी ह्याबाबत पूर्ण सहमत आहे
सारे धर्मशास्त्र हे ब्राम्हणांच्या जायदादींचे व हितसंबंधांचे रक्षण करणारे होते व त्यांचा ब्राम्हणांच्या ज्ञानाशी वा चारित्र्य उपासनेशी काहीही संबंध नाही व क्षत्रियांच्या शस्त्रबळाच्या आधारे ब्राम्हणांनी विषमतायुक्त व शोषणयुक्त अशी समाजाची घडी बसवली असे कुरुंदकर म्हणतात माझ्या मते हे केवळ ब्राम्हणांच्या जायदादींचे व हितसंबंधांचे रक्षण करणारे नाही तर हे क्षत्रियांच्या जायदादींचे व हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठीही घडवलेले आहे आणि वर्णजातिव्यवस्थेची साजिश ह्या दोन वर्णांनी मिळून रचलेली आहे म्हणून तर धर्मशास्त्र ब्राम्हणांचे व सांगणारे श्रीराम व श्रीकृष्ण साक्षात परमेश्वर ब्राम्हण भूदेव क्षत्रिय विष्णू वा तत्सम देवाचे अवतार अशी मांडणी पुढे येते
आपली संस्कृती अध्यात्मिक आहे हा भ्रम बाळगण्याचे काहीही कारण नाही कारण गुलामगिरी विषमता व शोषण ह्यांचे निर्लज्ज समर्थन हिंदूंच्या धर्मग्रंथात आढळते असे कुरुंदकर म्हणतात त्यामुळेच मनुस्मृतीबद्दलचा पूज्यभाव ब्राम्हणांच्या मनात आढळतो असे ते म्हणतात माझ्या मते भारतीय संस्कृती कधी ब्राम्हणी असते तर कधी अध्यात्मिक ! ती केवळ ब्राम्हणीच होती असे मानणे हा सुद्धा ब्राम्हणी अहंकारच ! महाराष्ट्रापुरते बोलायचे तर सातवाहन , वाकाटक , भोसले ह्यांच्या राजवटी कधीही ब्राम्हणी न्हवत्या ह्याउलट यादवांच्या राजवटी पूर्ण ब्राम्हणी वैष्णव त्यामुळेच तर यादवांच्या राजवटीतही महानुभवी पंथाला वैष्णव असूनही आपला पंथ लपवायची वेळ आली
कुरुंदकरांच्या मते ब्राम्हणांनी शस्त्रबळासाठी क्षत्रिय व संपत्तीसाठी वैश्यांना जवळ केले आर्थिक साधने ज्याच्याजवळ कमी त्या वैश्याला शूद्र समजले जाई असे कुरुंदकर म्हणतात माझ्या मते आर्थिक निकष त्याकाळी प्रधान न्हवते अन्यथा दरिद्री ब्राम्हणांची वर्णने काही कमी नाहीत वर्ण जन्माधिष्ठित होते असे खुद्द कुरुंदकर म्हणतात त्याच्या हे विरोधी जाते ह्या काळात आचारी व पाणके हे व्यवसाय ब्राम्हण करीत हे कुरुंदकर नोंदवतात पण ते का हे सांगत नाहीत माझ्या मते काहीवेळा अतिशुद्ध व अतिपवित्र पाणी काही धर्मविधींना लागे व अशा पाण्याला शूद्रांचा स्पर्श चालत नसे म्हणून मग हे काम ब्राम्हण करीत हीच गोष्ट प्रसादाबाबत तो ब्राम्हणेतरांच्या हातातला चालत नसे म्हणून तो बनवण्यासाठी स्पेशल ब्राम्हण लागे हा ब्राम्हण कम्पल्सरी शैव असे कारण पूजा ही मुळात आर्यांची संस्कृती न्हवती देवाच्या प्रसाद बनवणाऱ्या पवित्र व शुद्ध भटारखान्यात काम करणाऱ्या ह्या ब्राम्हणांना भटारखान्यातले म्हणून भट म्हंटले जाई आणि अनेकदा काही ठिकाणि ह्यांचा दर्जा शूद्र होता पेशवाई ही अशा भटांनी उभी केली
ब्राम्हण व क्षत्रिय युती कुरुंदकरांना दिसते ही युती निर्माण होण्याचे कारण कुरुंदकर आर्थिक संबंधात शोधतात माझ्या मते ते पुरेसे नाही. प्रश्न असा आहे कि आर्थिक संबंध फक्त लौकिक असतात काय? तर नाही ते पारलौकिकही असतात
तुमचा जर परलोकावर विश्वास असेल तर परलोकातही तुम्ही तुमचा क्लास जसाच्या तसा ठेवायला वा उन्नत करायला धडपडता तुमच्या क्लासची हेजिमनी टिकवायला धडपडतात आणि ह्याची गॅरेंटी जी काल्पनिक असते ब्राम्हण घेतात त्यामुळे ब्राम्हणांनी दाखवलेल्या स्वर्गनरकावर क्षत्रियांचा असलेला विश्वास मरणोत्तर जीवनावरचा धार्मिक विश्वास हीच तर ब्राम्हणांची ताकद असते व होती त्यामुळे ही ब्राम्हण क्षत्रिय युती नैसर्गिक भय व आशेच्या आधारे आणि काल्पनिक पारलौकिक तत्वांच्या आधारे झालेली युती होती संपत्ती निर्माण करणारे वैश्य ह्या दोन्ही वर्णांना हवे होते ते फायनान्सर म्हणून पण वैश्यांनाही स्वर्ग हवेच होते कि ! आणि कदाचित शुद्रांनाही ! धर्म हे नरकाचे भय व स्वर्गाची आशा ह्यांच्या आधारे तर उभे राहतात जोवर परलोक आहे तोवर ब्राह्मणसत्ता धर्मसत्ता अटळ मग तो धर्म कोणताही असो अगदी बौद्ध धर्मातही स्वर्ग नरक आहेतच पिरॅमिड्स तर फेमस आहेतच इथे तर स्वर्गात सोबतीला आपले दास दासी व सामान न्हेण्याचाही अट्टाहास आहे म्हणजेच मरणोत्तर पारलौकिक जीवनाची पारलौकिक क्लासची पारलौकिक हेजिमनीची क्षत्रियांना असलेली आसक्ती व हवी असलेली गॅरेंटी हीही ह्या युतीला कारणीभूत आहे असे दिसते
मूळ प्रश्न असा आहे कि कुरुंदकर म्हणतात तसे अनार्य जीत व आर्य जेते असे खरोखर काही भारतात झाले आहे काय ? आर्य विचारवंत असे झाले हे कोणत्या पुराव्याच्या आधारे म्हणतात ? कुरुंदकर हे प्रश्न विचारत नाहीत ते गृहीतच धरतात कि आर्यांनी अनार्यांच्यावर विजय मिळवला ह्यातूनच मग ह्या विजयानंतर जे झाले त्याचे समर्थन तरी करायचे किंवा निषेधन तरी असे दोनच पर्याय उरतात सर्वसाधारण आर्य आर्यांचा शूद्र निर्माण करण्याचा जो उद्योग आहे त्याचे समर्थनच करतात हे समर्थन कसे होते ?
ते म्हणतात कि आर्य आक्रमक व जीत होते म्हणून त्यांनी अनार्यांना आपल्या राज्याची सिटिझनशिप नाकारली सर्व जेते त्याकाळात असेच करत होते तर आर्यांनी तसेच केले त्यात चुकीचं काय?
ह्यावर माझा प्रश्न असा कि ह्याच न्यायाने मुसलमान तुमच्याशी जेते म्हणून त्यांच्या धर्माप्रमाणे वागले तर मग एव्हढा त्रागा कशाला करता ? दुसरी गोष्ट अनार्यांच्या राजवटीही ह्या देशात आल्या म्हणून त्यांनी आर्यांना शूद्र म्हणून वागवलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का ? ब्रिटिशांनी आपल्याला गुलाम बनवलं म्हणून त्यांच्याविरुद्ध बोंबा मारायच्या पण अनार्यांनी आर्यांच्याविरोधात बोंबा मारल्या कि जेते म्हणून केले हे समर्थन कसे चालेल आणि ह्याहीपुढचा प्रश्न जगात सर्व जेते जीतांना पेशवाईतल्या आर्यांच्याइतके वाईट पिढ्यानपिढ्या अस्पृश्य म्हणून वागवत होते का ? ब्राम्हणांचा पेशवाईतील वैदिक राज्यांच्यातील नालायकपणा हा जास्त क्रूर होता ही वस्तुस्थिती नाकारण्यात काय अर्थ आहे ?
दुसरी सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे जेते मुस्लिम व जेते ख्रिश्चन ह्यांनी धर्मांतर घडवून जीत लोकांना मुस्लिम व ख्रिश्चन बनवले आर्य लोकांनी काय केलं तर शूद्रांना वेदाधिकार नाकारला यज्ञाधिकार नाकारला संपत्तीअधिकार नाकारला जगाच्या पाठीवर कुठेही असं घडलेलं नाही वास्तविक आर्य जेते होते तर त्यांनी सर्वांना आर्य धर्मीय बनवायला हवे होते पण आर्यांच्याच म्हणण्यानुसार त्यांनी अनार्यांना शूद्र बनवलं आणि अनार्य चुपचाप शूद्र बनले ?
कुरुंदकर असे समर्थन करत नाहीत तर कडक निषेधन करतात आणि त्यातूनच हा ग्रंथ निर्माण होतो
पण पुढे कुरुंदकर म्हणतात
“ब्राह्मणवर्ग वर्णव्यवस्थेचा अभिमानी व समर्थक राहिला हे खरेच आहे. या व्यवस्थेचा त्यांनी लाभ घेतला, तिचे समर्थन केले, ती व्यवस्था राबविली, ती बळकट करण्याचा प्रयत्न केला, टिकवण्याचा प्रयत्न केला हे सारे खरेच. पण हे सारे मान्य केले तरी वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली असा मात्र याचा अर्थ होत नाही. समाजव्यवस्था निर्माण करण्याचे, टिकवण्याचे सामर्थ्य ब्राह्मणांच्याजवळ कधीच नव्हते. ती व्यवस्था व्यवहारात ब्राह्मणांना पुष्कळ सवलती देणारी असली तरी वाटते तितकी हिताची नव्हती.” (नरहर कुरुंदकर, मनुस्मृती, पृ. १६५-१७०)
इथे कुरुन्दकरांच्यातला निद्रिस्त वैष्णव झोपलेला हिंदूवादी गांधी अचानक जागा झालेला दिसतो
ह्याचा अर्थ ब्राम्हणांनी ही व्यवस्था टिकवली तिचे संवर्धन केले पण ती निर्माण मात्र केली नाही प्रश्न असा निर्माण होतो कि ही व्यवस्था ब्राम्हणांनी निर्माण केली नाही तर कुणी केली ?
श्रीधर तिळवे नाईक